कवितासंग्रह
Bai Dot Com बाई डॉट कॉम (२०१०)
माझ्या देहासाठी
कुणी देह झाले
कुणाच्या देहासाठी
मी देह झाले
देह देहातूनी अशी शृंखला
मी फक्त या साखळीतला दुवा
जगातल्या सगळ्याच बायका, गोर्‍या काळ्या, सुशिक्षित अडाणी, श्रीमंत गरीब, सगळ्यांचं भागधेय एकच असते का? शरीराच्या प्रेमातून ब्रह्मकमळ उमलू लागतं, मासोळीसारखं सुळसुळू लागतं, नव्या जीवाच्या स्पर्शानेच तिचे स्तन झुरमुरू लागतात, जुईच्या कळीसारखी बोटं तिचा हात धरून पावलं टाकत राहतात, तिची शाळा, तिचं जग, तिचं पाहता पाहता स्त्रीरूप होणं, मग प्रेम, लग्न, तिचं मूल, आपलं आजीपण, असंवादी मुकं मुकं म्हातारपण स्त्रीजन्माच्या या हजारो रंगछटा, हे शारीरिक मानसिक बदल स्वीकारत ती मुक्त होऊ पाहते आहे. एका रसिक वाचकानं लिहिलंय, कविता आवडणार्‍यांना त्या नक्कीच भावतील, न आवडणार्‍यांना त्या जरूर वाचाव्याशा वाटतील, असा एक हृदयस्पर्शी कवितासंग्रह


स्वतःचे स्वतःवर
स्वतःचे स्वतःवर
प्रेम असावं
आरशात पाहताच
स्वतःच्या रूपावर
भाळून जावं
छान दिसतेस
असं कुणी कशाला
म्हणायला हवं
आपण आहोतच छान
हे आपलं आपल्याला
कळायला हवं

असेल नाक अपरं
रंगही नाहीच केतकी
कोणाला वाटते उंच
कोणाला ठेंगणी ठुसकी
पण दुसर्‍याच्या
मोजमापात
स्वतःला कशाला
बसवायला हवं
स्वतःकडे पाहून
एक गिरकी घेऊन
स्वतःच आनंदून
जायला हवं
आपण आहोतच छान
हे आपलं आपल्याला
कळायला हवं

सदाच कशाला
स्नो पावडर
कोरीव भुवया
मेकअपचा थर
निसर्गानं दिलेलं
शरीर सुंदर
निरोगी मात्र
असायला हवं
आपण आहोतच छान
हे आपलं आपल्याला
कळायला हवं

नसो नसेल तर
रेशमी साडीचा पदर
साधाच असेल
सलवार कमीज
दुपट्टा त्यावर
असल्या गोष्टी
असतात वरवर
त्यानं कशाला
दुःखी व्हायला हवं
आतलं मन मात्र
आकाशासारखं
निरभ्र असायला हवं
आपण आहोतच छान
हे आपलं आपल्याला
कळायला हवं

विश्वास असेल
आपला आपल्यावर
विरोधाचे सूर सुद्धा
होतील सुस्वर
कर्तृत्वाचं एक फूल
उमलेल तुझ्या वेलीवर
प्रसन्न टवटवीत
गुलाबासारखं
तेव्हा मात्र हसायला हवं
आपण आहोतच छान
हे आपलं आपल्याला
कळायला हवं


सूर
सुरात मिसळला असेल सूर
जगणेही सोपे होते
जरी एकमेकांपासून दूर

त्याचा फोन येतो
ती जीवाचा कान करून ऐकते
त्याचे इ-मेल येते
ती डोळ्यात प्राण आणून वाचते
त्याचा आवाज त्याचे शब्द
हृदयाच्या कुपीत साठवून ठेवते
कल्पनेत सुद्धा ती लाजेने होते चूर
सुरात मिसळला असेल सूर
जगणेही सोपे होते
जरी एकमेकांपासून दूर

तो काय जेवला
ती सांगू शकते
तो कुठे गेला
तिला ठाऊक असते
तो नाही झोपला
तिला दिसू शकते
त्याच्या निःश्वासानेही तिचा बदलतो नूर
सुरात मिसळला असेल सूर
जगणेही सोपे होते
जरी एकमेकांपासून दूर

त्याचा वास तिच्या भोवती
त्याचा श्वास गळ्यात मोती
त्याचा स्पर्श ताजे फूल
रोमरोमात चढते भूल
काही रुजवले त्याने आत
त्याचे पडसाद तिच्या मनात
मिठीच्या भेटीसाठी माजते मनात काहूर
सुरात मिसळला असेल सूर
जगणेही सोपे होते
जरी एकमेकांपासून दूर

तो येण्याचा दिवस
ती क्षणाक्षणाने मोजते
त्याचे आतुर शरीर
मनभर टिपून घेते
कासावीस डोळ्यातले पाणी
ना दाखवता पुसून घेते
दाबून धरते हृदयातले महापूर
आणि स्वतःशीच म्हणते
सुरात मिसळला असेल सूर
जगणे फार अवघड होते
जेव्हा एकमेकांपासून दूर

Bai Dot Com समग्र स्त्रीसूक्त
समग्र स्त्रीसूक्त हा स्त्रीच्या तनमनाचा आणि स्त्री –पुरूषांमधील गुंतागुंतीच्या नात्याचा एक उभा आडवा छेद आहे. जात, धर्म, देश, वंश, रंग रूप, संस्कृती, भाषा कोणतीही असो, स्त्री जातीचे अटळ भागधेय कुठल्याही स्त्रीला चुकत नाही. स्त्री म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकीचाअंतर्बाह्य चेहरा या कवितेत प्रतिबिंबित झाला आहे. स्त्रीत्वाच्या एका वैश्विक धाग्याने जगातील प्रत्येक स्त्री एकमेकीशी जोडली आहे. या अनुबंधाचा नेमका गाभा स्त्रीसूक्तमधील कवितांनी पकडला आहे. जन्मापासूनमृत्यूपर्यंतच्या स्त्रीच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेचा हा स्त्रीच्या नजरेतून घेतलेला वेध आहे; म्हणूनही कविता प्रत्येक स्त्रीची आणि समंजसपणेतिला जाणून घेणाऱ्या प्रत्येक पुरुषाची आहे.
Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.