संपादित
Amcha Ladha Amcha Sangharsha आमचा लढा आमचा संघर्ष (२०१३)
‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी मेंढरे बनून वाटयाला आलेले आयुष्य मुकाट जगणारी स्त्री मनाने अपंग होते. पण काही सामान्य स्त्रियासुद्धा अंगावर येणार्‍या लाटेवर स्वार होतात, झुंजत राहतात, लढत राहतात, कधी जिंकतात, कधी हरतात, पण महत्त्व असते ते ‘फायटिंग स्पिरीटला’. लढण्याच्या जिद्दीला, स्वतःवरच्या विश्वासाला, त्यामुळे लढण्यासाठी लागणारे मानसिक बळ मिळते. आपले कुटुंबीय, नातेवाईक, रूढी, परंपरा, नोकरी व्यवसायातील अचानक आलेल्या समस्या, दुर्धर आजार, मनोरुग्ण मुले, एवढेच काय आपल्या स्वतःशीसुद्धा आपल्याला लढावे लागते. आपणच निर्माण केलेल्या पिंजर्‍यातून स्व-तंत्र जगण्यासाठी, बाहेर पडण्यासाठीही स्वतःशी केलेला संघर्ष महत्वाचाच असतो. जवळ जवळ पन्नास स्त्रियांनी आपल्या छोट्या मोठ्या लढाईच्या पोतडया शब्दातून इथे खुल्या केल्या आहेत. वाचकांना हे लढे नक्कीच स्फूर्ती देतील, कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची सकारात्मक ऊर्जा देतील, आणि ताठ मानेने जगायला शिकवतील.

Streevadi भारतीय भाषातील स्त्रीवादी साहित्य – जाने २०१६
जवळ जवळ सर्व भारतीय भाषांमधून स्त्रीवादी साहित्याचा एक जोमदार सशक्त प्रवाह गेल्या ४० वर्षात निर्माण झाला आहे. आपण स्त्री आहोत म्हणजे कोण आहोत इथून स्वतःचे परीक्षण करत हा प्रवास सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय सत्ताकारणाला प्रश्न करत एका व्यापक विश्वभानापर्यंत पोचतो. स्त्रियांचे क्षमताधिष्ठित हक्क प्रस्थापित करून समतेच्या तत्वावर समाज परिवर्तन घडवू पाहणार्‍या भारतभरातील सर्जनशील स्त्री लेखकांच्या साहित्याचे अनोखे दर्शन चकित करणारे आहे. स्त्रीवाद आणि समाज यांचे अन्योन्य संबंध तपासणारी प्रदीर्घ प्रस्तावना हे या ग्रंथाचे विशेष महत्त्व. भारताच्या व्यापक नकाशावर घडणार्‍या स्त्री साहित्याचे विश्लेषण करणारे हे भारतीय भाषांमधले पहिलेच मराठी पुस्तक आहे.
प्रकाशक : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.
Designed and developed by Piton Systems