कवितासंग्रह
Streesukta स्त्रीसूक्त (प्रथमावृत्ती १९८८, द्वितीयावृत्ती १९९७)
त्या कवितेवर तिची फिर्याद आहे जिने प्रेमाच्या भाकड कल्पनांना अंजारून गोंजारून चांदण्यांचे आरसेमहाल पोकळ अलंकारांनी सजवले नटवले. अशी बंडखोर भूमिका घेऊन आधुनिक स्त्रीचं वास्तव व्यावहारिक जग रोखठोकपणाने कवितेत थेट मांडणार्‍या या पुस्तकानं मराठी साहित्यात खळबळ उडवून दिली आणि स्त्रीवादी कवितांचा एक नवा प्रवाह कवितेत सुरु झाला.
शहरी संस्कृतीत वाढलेल्या, शिकलेल्या, पैसा कमावणार्‍या स्त्रीचं यंत्रवत आयुष्य, वैवाहिक जीवनात सतत येणारे दडपलेपण, स्वप्नाळू काव्यात्म वृत्तीची नाळ तुटून पदोपदी अनुभवाला येणारी पुरुषसत्तेची व्यावहारिक गद्य वृत्ती या कवितेतून, सर्व स्त्रीजातीचाच शतभंग झालेला विद्रूप चेहरा प्रतिबिंबित करते. ‘आपण कोण?’, ‘आपला जन्म कशासाठी?’ असे मूलभूत प्रश्न स्वतःला करणारी ही कविता स्त्रीच्या अंतरात्म्याला सोलून हातावर ठेवते. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहाचा केशवसुत पुरस्कार, साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार असे मानाचे पुरस्कार पटकावून या कवितेने मला कवी म्हणून नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा दिली. हिंदी, गुजराती भाषेत हे पुस्तक अनुवादित झाले. भारतीय कवींच्या काव्यसंग्रहात अर्लीन झाईड या अमेरिकन संपादिकेने ‘इन देअर ओन व्हॅायसेस’ या पुस्तकात यातील काही कविता छापल्या आणि ‘लँग्वेज अँड जेन्डर’ या अमेरिकेतील पाठ्यपुस्तकातही त्यांचा समावेश झाला. यातील ‘बोन्साय’ आणि ‘यंत्र’ या दोन कवितांची ही एक झलक!

बॉन्साय
केसांना डाय लावून
तिने आपले तरुणपण रोखून धरले
ओठांना लाल लिपस्टिक लावून
सुकलेले गुलाब ताजे केले
भुवया नीट कोरून काढून
मदनबाण सज्ज ठेवले
ब्युटी पार्लर मध्ये फेशियल करून
टीनएजर मुखवटे घातले
रेशमी वस्त्रे अंगावर लपेटून
गरम रक्त सळसळत ठेवले
वयाची उंची कापता कापता
आयुष्याचेच बॉंन्साय झाले

यंत्र
विकणे आहे
एक उत्साही कामसू देखणे
जिवंत तरुण यंत्र
स्वैपाक करते
कपडे धुते
नोकरी करून
पैसा मिळविते
पाहुण्यांची सरबराई करते
घरसुद्धा झकपक ठेवते
आल्या आल्या हसून स्वागत करते
चहा पोह्याच्या डिशेस तयार ठेवते
शरीराची गरज भागवते
वंशाला दिवा देते
कधी बिघडलेच तर बडबड करते
चार दोन थपडांत जागेवर येते
खर्चसुद्धा फार नाही
रोजच्या जेवणात भागून जाई
पन्नास हजारासहित सालंकृत घरपोच
त्वरा करा
आपली ऑर्डर आजच नोंदवा

प्रकाशक: श्रीविद्या प्रकाशन, पुणे
Anvay अन्वय (१९९२)
शब्दांइतके असंवादी
काहीच नसते
शरीराइतके बोलके
काहीच नसते
आयुष्यातले एकेक प्रश्न, विसंगती, असंवाद, जन्ममृत्यूचे कोडे, सत्तासंघर्ष, मरणसोहळ्याचे देखावे, स्त्रीचे आणि वेदनेचे नाते, सुसंस्कृत माणसांच्या हातातील गुप्त शस्त्रास्त्रे, आंतरिक एकटेपणा – जगण्याच्या अनुभवातील एकेक गाठी निरगाठी सोडवत – कधी अधिक गुंता करता करता- जीवनाचा अन्वय लावू पाहणारी ही कविता. या संग्रहाची सुरवातच होते धन्य बाईपणाच्या उपरोधातून.


धन्यो स्त्रीजन्मः
बरे झाले देवा । केलासी उपकार
घातलेस जन्मा| बाईच्या ह्या ।।

स्पृश्या घरी जन्म| देऊनिया परी
कळो आल्या कळा । अस्पृश्याच्या ।।

दिधलासी जन्म| मनुष्य योनीत
दुःखे प्राणियांची । दाविलीस ।।

सरणाविना जळणे । उभा जन्म मरणे ।।
पाण्याविना बुडणे । आले आपोआप ।।

न कळे कोणा । अर्थ बोलण्याचा
भाषेनेही मुके| केले आम्हा ।।

बरे झाले देवा । केलासी उपकार
घातलेस जन्मा| बाईच्या ह्या ।।

Apourusheya अपौरुषेय (१९९८)
वेद अपौरुषेय, तशा बाईच्या कविताही! त्या माझ्या एकटीच्या नाहीत. हा अपौरुषेय आवाज आहे सार्‍या स्त्रीजातीचा. मी केवळ त्यांची एक मनस्वी प्रतिनिधी. हा सनातन आवाज प्रत्येकाच्या मनाच्या खोल तळापर्यंत पोचावा आणि तिथून स्त्रीजातीच्या सन्मानाचा हुंकार उमटावा ही यातल्या प्रत्येक कवितेमागची तळमळ! उंबरठयाआडच्या अंधारातून पुरुषांचा हात धरून एकेक पाऊल बाहेर टाकायला शिकलेल्या स्त्रीच्या शतकापूर्वीच्या प्रवासापासून ‘माझे हात माझे दिवे आहेत, माझी पावले माझ्या दिशा’ असा साक्षात्कार झाल्यावर असीम आकाशावर पंखांना झोकून देणार्‍या आणि स्वतंत्रतेचे गीत गाणार्‍या आत्मनिर्भर स्त्रीचा आत्मस्वर व्यक्त करणार्‍या या संग्रहाने ग.दि.मा. पुरस्कार तर पदार्पणातच पटकावला, पण या शिवाय ‘मी पाण्याच्या जातीची’ ही कविता २००६ मध्ये सर्वभाषिक अखिल भारतीय कवीसंमेलनात मराठीतील सर्वोत्कृष्ट कविता म्हणून २६ जानेवारीला २२ भारतीय भाषांमध्ये नभोवाणीवरून एकाच वेळी प्रसारित झाली.


पाण्याच्या जातीची
असेन ज्या घटात
त्या घटाच्या रंगरूपाची
मी पाण्याच्या जातीची

विहिरीत टाका
संथ पडून राहीन
झर्‍यात टाका
झुळझुळत राहीन
समुद्रात टाका
मेघ होऊन बरसात राहीन
माता मी हिरव्यागार जगाची
मी पाण्याच्या जातीची

तहानलात
तृप्त करीन
धगधगत्या ज्वालांतून
मुक्त करीन
स्पर्शानेही
सुख देईन
कामिनी मी शुभ्र गुणांची
मी पाण्याच्या जातीची

पाण्यात पहा
तुमचेच प्रतिबिंब असेल
सर्वांगावर घ्या
पाणी अलिप्त असेल
मुठीत ठेवा
मूठ रीती असेल
कुमारी मी युगायुगाची
मी पाण्याच्या जातीची

असेल मनात
सरळ चालेन
उतले मातले
काठ सोडून धावेन
कडे कपारीतून
उडी मारेन
स्वैरिणी मी चंचल मनाची
मी पाण्याच्या जातीची

शांत असेन
असेन रौद्र
शीतल असेन
असेन तप्त
जीवन देईन
घेईन जीवन
स्वामिनी मी सार्‍या जगाची
मी पाण्याच्या जातीची

फुलांवर उमलेन
दंवबिंदू होऊन
पापण्यांवर तरळेन
अश्रू लेवून
शिंपलीत लपेन
मोती होऊन
तेजस्विनी मी तलवारीच्या धारेची
मी पाण्याच्या जातीची

Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.