मनोगत
स्वतःबद्दल सांगायला मला नेहमीच संकोच वाटतो आणि स्वतःची वेबसाईट म्हणजे स्वतःहून स्वतःची जाहिरात केल्यासारखं! पण आजच्या जमान्यात या तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आलंय. मला माहीत नसताना माझी एक कविता अमेरिकेतल्या लँग्वेज अँड जेन्डर या पाठ्यपुस्तकात पोचली देखील! त्यावरच्या प्रतिक्रियाही मला सोशल साईट्सवर वाचायला मिळू लागल्या. अनेक कविता, निनावी, व्हॅाट्स अॅपवर फिरू लागल्या तेव्हा वाटलं की निदान आपली व्यवस्थित माहिती तरी उत्सुकांपर्यंत पोचावी. म्हणून हा वेबसाईटचा खटाटोप. या संदर्भात भेटावसं वाटलं, अधिक माहिती हवीशी वाटली तर मी उपलब्ध आहे: ashwinid2012@gmail.com वर!
माझ्याविषयी :
सुरुवात नावापासून करते. पहिलं नाव विजया बर्वे. लग्नानंतर अश्विनी धोंगडे. त्याला ४५ वर्षं उलटून गेल्यामुळे लोकांच्या तोंडी तेच अधिक रूळलेलं. जन्म पुण्यातलाच – २१ जानेवारी १९४७. वडील द.के.बर्वे मराठीचे प्राध्यापक, लेखक, प्रकाशक. आई मालती बर्वे एका प्राथमिक शाळेची संस्थापक आणि मुख्याध्यापक.
माझं शिक्षण एम.ए. (इंग्रजी) आणि नंतर १९७१ पासून एस.एन.डी.टी. महाविद्यालयात इंग्रजी शिकवता शिकवता वीस वर्षांनी ‘जाहिरातींची भाषाशैली’ (Linguistic Analysis of Commercial Display Advertisements) या विषयात डॉक्टरेट. मग इंग्रजीची प्रबंध मार्गदर्शक व परीक्षक!
१९९२ पासून याच महाविद्यालयात प्राचार्य व १४ वर्षाच्या प्रदीर्घ कालानंतर २००७ मध्ये निवृत्त. या न त्या निमित्ताने भरपूर प्रवास आणि भरपूर लेखन आयुष्यभर! स्त्री हा विशेष अभ्यासाचा आणि आवडीचा विषय पण शोषित, परीघावरची, वंचित, संघर्ष करणारी माणसेही अभ्यासाचा आणि लेखनाचा विषय. तसेच संपादन आणि बालसाहित्य लेखन हे सुद्धा आवडीचे काम! अभ्यासाचा विषय इंग्रजी असल्यामुळे लेखनाची सुरुवात केली ती इंग्रजी कादंबरीच्या रूपांतरणाने!

दिलीपराज प्रकाशन, पुणे यांची सर्व पुस्तके www.diliprajprakashan.in या वेबसाईटवरून आपण ऑनलाईन खरेदी करू शकता
Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.
Designed and developed by Piton Systems