![]() |
मराठी भाषा आणि शैली (प्रथमावृत्ती १९८५, द्वितीय १९९०, तृतीय १९९३, चौथी २००६). डॉ. रमेश धोंगडे आणि डॉ. अश्विनी धोंगडे यांचे निम्मे निम्मे लेख असलेले हे भाषाशैलीवरचे अनेक विद्यापीठांनी संदर्भग्रंथ म्हणून लावलेले आणि मराठी अभ्यास परिषदेचा महाबँक पुरस्कार मिळालेले अभ्यासपूर्ण पुस्तक. शैली विज्ञान आणि भाषा विज्ञान यांचा परस्पर संबंध, शैलीच्या व्याख्यांची चिकित्सा अशा तात्विक विवेचनानंतर नाटक, कविता, कथा, कादंबरी, इथपासून ते जाहिरातींच्या भाषाशैलींपर्यन्तचे बहुविध स्तरावरचे विवेचन या ग्रंथात आहे. सैद्धांतिक चर्चा, उपयोजन, संस्कृत, इंग्रजी व मराठी शैलीविज्ञान आणि साहित्यविचार एकत्रितपणे अभ्यासणारा हा मौलिक ग्रंथ वैशिष्टयपूर्ण ठरला आहे. |
![]() |
स्त्रीवादी समीक्षा: स्वरूप आणि उपयोजन (प्रथमावृत्ती १९९३, द्वितीयावृत्ती २००२, तृतीयावृत्ती २००९) स्त्रीवादाचा पाश्चिमात्य विचार निःसंदिग्धपणे मराठीत मांडणारा आणि त्याचे काव्य, कहाणी, आत्मचरित्र, कादंबरी या संदर्भात प्रत्यक्ष उपयोजन करून दाखवणारा हा स्त्रीवादी समीक्षेचा मराठीतील पहिला ग्रंथ होय. महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या पदव्युत्तर व संशोधनात्मक चिकित्सेसाठी हा ग्रंथ प्रमाणभूत मानला जातो. कर्नाटक विद्यापीठानेही तो कानडीत भाषांतरित करून घेऊन अभ्यासासाठी लावला आहे. स्त्रीवाद हा सबंध स्त्रीजातीच्या मानवपणाच्या संदर्भात, पुरुषसत्ताकाविरोधात बंडखोरी करून स्त्रीचे स्वातंत्र्य व आत्मनिर्भरता प्रस्थापित करणारा असल्याने त्याला समाज परिवर्तनाच्या व स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. स्त्रीवादाचा उदय, धार्मिक, सामाजिक व मानसशास्त्रीय दृष्टीकोन यांचा परामर्श घेऊन स्त्रीवादी समीक्षेची वैचारिक बैठक सविस्तरपणे या ग्रंथात मांडली आहे. |
![]() |
संदर्भ स्त्री पुरुष (२००३) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुरस्कार देऊन हे पुस्तक गौरवण्यात आले. स्त्रीवादी समीक्षेच्या संदर्भात लिंगभेद आणि लिंगभाव यातील फरक स्पष्ट करताना पुरुष साहित्यिक आपल्या साहित्यात स्त्रियांचे रेखाटन कसे करतात, स्त्रीच्या व्यक्तिचित्रणाचा रोख एक स्त्री म्हणून होतो की व्यक्ति म्हणून, स्त्रीच्या म्हणून काही वेगळ्या भाषेचा विचार कसा होतो, याचा विचार करत – लिंगभावाचे विश्लेषण हे मानवी विकासाचे साधन कसे बनू शकते, स्त्री सबलीकरण म्हणजे काय इत्यादी अनेक विषयांचे संदर्भासहित स्पष्टीकरण प्रस्तुत पुस्तकात येते. विशेषकरून लो.टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, विजय तेंडुलकर, महानोर आणि नारायण सुर्वे यांच्या लेखनातील स्त्रीचित्रणाचे परखड विवेचन या ग्रंथाचे एक खास आकर्षण आहे. |
![]() |
अर्धे आकाश आकाश म्हणजे अवकाश (स्पेस). पुरुषप्रधान जगाने या अवकाशावरही कब्जा मिळवला आहे आणि स्वतःसाठी थोडा तरी अवकाश निर्माण करण्यासाठी स्त्रियांना लढावे लागले आहे. या अवकाशात स्वतःचा वेळनसणे, स्वतःचा पैसावा निवास नसणे – एवढेच काय, स्वतःचा म्हणून घरात एक कोपरा, एकखासगी डायरी आणि छोट्या-मोठ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुभा नसणे – अशा कित्येक गोष्टी येतात. ‘मी कोण?’ याचा स्वतंत्रपणे विचार न करता येणे, हासुद्धा अवकाशाच्या संकोचाच भाग आहे. कारण स्वतंत्र विचार हासुद्धा स्त्रीचा कुवतीबाहेरचा आहे, हे गृहीतच धरले आहे. स्वतंत्र विचार नाहीतिथे स्वतंत्र कर्तुत्व नाही. तिथे मानसिक गुलामगिरी आहे. आपल्या जगण्याचा कोणत्याही प्रकारचा भर जो दुसऱ्यावर टाकतो, त्याला स्वतःच्या आकाशाची गरजच वाटत नाही. कुटुंब चालवणाऱ्या, पैसा कमावणाऱ्या स्त्रियांनाही जर समाजाने बुद्ध्या मानसिक पंगुत्व दिले तर त्यांच्यामध्ये आकाशाच्या मागणीसाठी धडाडी कुठून येणार? ही सर्व जोखडे झुगारून आत्मनिर्भर होण्यासाठी अर्ध्या आकाशाची मागणी! |