![]() |
देशांतर (प्रथमावृत्ती १९९९, द्वितीयावृत्ती २००५) परदेशात जाऊन आल्यावर प्रवासवर्णन लिहिणे ही काही आता नवलाईची गोष्ट राहिली नाही. प्रवासवर्णन म्हणजे तिथल्या प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन नव्हे तर तिथल्या जीवनशैलीचा उत्कट अनुभव घेण्याची अंतरओढ व तितक्याच उत्कटपणे तो वाचकांपर्यंत पोचवण्याची कला. व्यक्तीस्वातंत्र्याला जगात कोणत्याही मूल्यांपेक्षा अधिक किंमत देणारी अमेरिका पश्चिमी संस्कृतीचं एक टोक, व्यक्तीस्वातंत्र्य हा शब्द उच्चारणं सुद्धा जिथे गुन्हा ठरतो, अशी साम्यवादाची पोलादी चौकट व्यक्तीभोवती घट्ट बांधून ठेवणारा अतीपूर्वेकडचा साम्यवादी देश उत्तर कोरिया आणि शंभर वर्षाच्या साम्यवादी परंपरेचा शेवट करून लोकशाही मूल्यांकडे झेपावू पाहण्याचा ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोयकाचा रशियातील काळ, जगातील तीन राजकीय प्रणाल्यांचे दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. हा प्रवास अत्यंत अनुभवसंपन्न करणारा होता. साम्यवादी देशात मी सोन्याच्या पिंजर्यात बंदिस्तपणे राहून, माणसांच्या वागण्याच्या फटीतून भरडली जाणारी माणसे, उत्तर कोरियात पाहिली, राज्यक्रांतीच्या स्थित्यंतराच्या अत्यंत नाजूक काळात प्रचंड आर्थिक अस्थैर्य , बाजारात वस्तूच उपलब्ध नसणे अशा वेळी भूतकाळाचा आधार सुटलेल्या आणि भविष्याच्या अंधारात चाचपडणार्या सामान्य रशियन माणसाच्या हृदयातली धडधड अनुभवली, बलाढय आर्थिक सत्ता असणार्या अमेरिकेतील प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन टाळून तिथल्या म्हातार्यांचे करूण जीवन, तरुण गोर्यांचे विलासी जीवन आणि काळ्या माणसांच्या हालअपेष्टा माझ्या मनावर अधिक ठसल्या. भारतीय संस्कृतीशी या तीन संस्कृतींची तुलनाही या पुस्तकात परावर्तित झाली आहे. भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचा उत्कृष्ट प्रवासवर्णनाचा शारदा पुरस्कारही या पुस्तकाला लाभला. |
![]() |
मध्यरात्रीच्या सूर्याचा देश- फिनलंड (प्रथमावृत्ती २००५, द्वितीयावृत्ती २०१०, तृतीयावृत्ती २०१३) फिनलंडसारख्या युरोपच्या उत्तर टोकातील एका छोटयाशा देशात तीन महिने मुक्काम केल्याने तेथील जनजीवन, लोकसंस्कृती आणि अतिसंपन्न निसर्ग मला फार जवळून पाहता आला. अथांग निळे पाणी, त्यावर मधेमधे हजारो हिरवीगार बेटे, हिवाळ्यातले पांढरेशुभ्र हिमसौंदर्य आणि वसंतातला मध्यरात्रीपर्यंत रेंगाळणारा सूर्य – दिवस रात्रीच्या सीमारेषा मिटवणारे हे सूर्यप्रकाशी लांबलचक दिवस. निसर्गाचे हे विभ्रम आनंदी वृत्तीने क्षणोक्षणी भोगणारी फिनिश माणसे, त्यांनी केलेली अचंबित करणारी तंत्रज्ञान प्रगती, एका मोठया जगातलं हे स्वतःचा वेगळा चेहरा असलेलं छोटंसं जग – स्वतःचा रंग, स्वतःचा गंध, स्वतःचा स्पर्श असलेलं – माणसांचं आणि तरीही माणसांचं नसलेलं सुद्धा – तिथं माझं काहीतरी राहिलेलं आहे आणि तिथलं मी काहीतरी उचललेलं आहे अशी चुटपूट लावणारा हा देश – हा अनुभव वाचकांनी घ्यायलाच पाहिजे असा! |