चरित्र
Swatantra Yoddha स्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्युथरकिंग (ज्यु.) (२०१२)
अब्राहम लिंकनने गुलामी नष्ट करून काळ्या लोकांना स्वातंत्र्य बहाल करून शंभर वर्षे लोटली तरी गोर्‍या अमेरिकेने प्रत्यक्षात सर्व ठिकाणी वर्णभेद करून काळ्यांना कधीच समान दर्जाची वागणूक दिली नाही. गोर्‍यांच्या बलाढय सत्तेला महात्मा गांधींच्या अहिंसा आणि सत्याग्रह या दोन तत्वांचा अवलंब करून ज्याने चिवट झुंज दिली आणि १९६४ मध्ये नागरी हक्क कायदा पास करायला भाग पडून लाखो काळ्या लोकांना नागरी जीवनात समानता प्राप्त करून दिली त्या स्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्युथर किंगचे (ज्यु.) हे उत्कट कादंबरीइतकेच रोमांचक आणि स्फूर्तीदायी चरित्र. व्यवसायाने धर्मगुरू, तत्वज्ञानाचे अभ्यासक, विचारवंत, बुद्धिमान, कृतीशील चळवळीचा नेता, लाखो लोकांना खिळवून ठेवू शकणारा अत्यंत प्रभावशाली वक्ता, कणखर कठोर पण तितकाच हळूवार संवेदनशील माणूस, प्रेमाने जग जिंकू बघणारा आणि शेवटी सार्‍या मानवतेलाच कवेत घेऊ बघणारा शांततेचा नोबेल पुरस्कार विजेता नेता. त्याचे आयुष्य जितके संघर्षाचे, तितकाच त्याचा मृत्यूही धक्कादायक. मार्टिनची ही जीवनकथा वाचता वाचता प्रत्येकालाच अंतर्मुख बनवते आणि मार्टिन म्हणतो त्याप्रमाणे, या विश्वाच्या घडामोडीत अशी एक शक्ती आहे जी अंतिमतः सत्याचा विजय घडवून आणते आणि कठीण काळातून प्रवास करायला तुम्हाला बळ देते.

Swatantra Yoddha तेजोनिधीच्या तेजशलाका
गुरूने शिष्याचे आयुष्य घडवल्याची शेकडो उदाहरणे जगात सापडतील; पण ज्यांच्या आयुष्यातील अंधारवाटांनी ज्याचं माणसासारखं जगणंच संपवलंय, अशा तरुण विधवांच्या आयुष्यात प्रकाश पेरणारा ऋषितुल्य गुरु म्हणजे विसाव्या शतकातला एक किमयागार!
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे या तेजोनिधीने दगडासारख्या निश्चेतन झालेल्या हजारो स्रियांचे आयुष्य तेजोमय करून टाकले. त्यातल्या काही निवडक तेजशलाकांचीही धावती ओळख. स्वतःची स्वतःला ओळख पटलेल्या या स्रियांनी आपल्या कर्तुत्वाने गगनाला गवसणी घातली. गुरूने दिलेली समाजऋणाची परतफेड तितक्याच समर्पित वृत्तीने गुरूंच्या कार्याला अर्पण केली.
दंतकथा वाटाव्यात अशा या गोष्टी जागतिकीकरणातील स्वकेंद्री-चंगळवादी समाजाच्या विस्मरणात जाऊ नयेत, म्हणून हा लेखनप्रपंच.

Ashwini Dhongde. 2016. All Rights Reserved.