वर्तमान (१९९७) ‘कोणीही बाई म्हणून जन्माला येत नाही, समाज तिला बाई बनवतो’. अशा अर्थाचे फ्रेंच विचारवंत सिमॉन द बुव्हा हिच्या सेकंड सेक्स या पुस्तकात एक वाक्य आहे. घराच्या चार भिंतीत कोंडली गेलेली कालची अशिक्षित बाई, स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाच्या आधाराने स्वतःच्या पायावर उभी राहू पाहणारी २० व्या शतकातली सुशिक्षित स्त्री आणि आत्मसन्मान, आत्मनिर्भरता यांच्या प्रकाशरेषेकडे गतिमान प्रवास करणारी आजची स्त्री – अत्यंत लालित्यपूर्ण छोटया छोटया प्रसंगातून प्रत्येक वाचकाला अंतर्मुख करून विचार करायला लावणारे हे लेख प्रत्येक स्त्री पुरुषांना आपलंच प्रतिबिंब पाहायला लावतील. | |
जगणे व्हावे सुंदर म्हणूनी (२००६) प्रत्येकालाच आपलं जीवन सुंदर असावसं वाटतं पण प्रत्येकाचं जीवन सुंदर असतंच असं नाही ते सुंदर बनवता येतं प्रयत्नांनी स्वच्छ मनमोकळ्या हवेत मुक्त श्वास स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणं स्वतःला स्वतःची ओळख म्हटलं तर सोप्या गोष्टी म्हटलं तर महाकठीण! तारुण्यातली रंगीत स्वप्नं मित्र मैत्रिणींची सुरेल मैफल पण एखाद्या बेसावध क्षणी वाटा चुकतात, पाय घसरतात नाजूक जागी कठोर घाव बसतात दिशा अंधारून येतात मी का जगायचं? कोणासाठी? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न असं होऊन चालणार नाही हवा एखादा आधाराचा हात एखादी शाबासकी पाठीवर धीराचे चार शब्द युवक युवतींच्या आयुष्यातलं प्रश्नांचं मोहोळ आणि आशावादाच्या किरणांचा मोहक पिसारा.. तरुण मुलं, मुली, पालक, रसिक वाचक यांनी वाचायलाच हवा असा निखळ आनंददायी पण उद् बोधक लेखसंग्रह. | |
बायकांविषयी बरेच काही (२०१३) स्त्री असली तरी ती माणूस असते. आपली बुद्धी, विकार, शहाणपणा, व्यवहाराच्या कसावर घासून स्वतःला सिद्ध करता यायला हवं आणि अस्मितेला धक्का लागला तर संघर्ष करायची तयारी हवी. चंगळवादाच्या आजच्या युगात कधी नव्हे इतकं स्त्रीचं अवमूल्यन झालं आहे. स्त्री सौंदर्याचं हिडीस प्रदर्शन, स्त्रियांचा व्यापार, लैंगिक शोषण, अत्याचार, बलात्कार या गोष्टी तर नित्याच्या झाल्याने एक प्रकारची बधीरता आली आहे. अर्धे आकाश बायकांचे आहे तरी त्या आकाशावर तरी स्त्रिया सत्ता गाजवतात का? गल्लोगल्ली, रस्तोरस्ती बायकांचे दबावगट निर्माण झाले तर कुणाची छाती आहे मुलींची छेड काढण्याची? अशा वाघिणीसारख्या बायका कमी आहेत का? अजिबात नाही. फक्त त्यांची एकजूट हवी. भगिनीभाव हा आजचा परवलीचा शब्द आहे. वैचारिक परिवर्तनाला चालना देण्याच्या हेतूने लिहिलेल्या या पुस्तकातला प्रत्येक शब्द न शब्द जणू विद्युतभारीत आहे. स्त्रीविषयक उत्कृष्ट ग्रंथासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कमल व के.पी.भागवत पारितोषिक आणि स्नेहवर्धन प्रकाशन संस्थेचा डॉ.वि.भि.कोलते समीक्षामित्र पुरस्कार या पुस्तकाने पटकावला आहे. | |
४ द्विभाषिक पुस्तके |