बाळंतपण बोल अनुभवाचे (२००९) हे पुस्तक हा एक आव्हानात्मक प्रकल्प आहे आणि तो पूर्ण करायला मला दोन पूर्ण वर्षे लागली. हा काही शरीरशास्त्रविषयक बाळंतपणावरील ग्रंथ नाही. सर्जनकाळात स्त्रीचा आत्मसन्मान जपला जातो का याचा शोध घेणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. जवळ जवळ १३० स्त्रियांच्या मुलाखती व प्रश्नोत्तरांवर आधारित अशा या ग्रंथात स्त्रीला दिवस गेल्यापासून मूल तीन महिन्याचं होईपर्यंतच्या वर्षभरातील काळात असणार्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीची मनःस्थिती कशी असते, नवर्याचा आणि कुटुंबियांचा प्रतिसाद कसा असतो, मूल जन्माल्यावरच्या भोवतालच्या लोकांच्या प्रतिक्रिया काय, यात स्त्रीचा मानपान, आत्मसन्मान याची जाणीव तरी असते का, अशा बारीक बारीक प्रश्नांचा धांडोळा घेताना समाजाच्या चेहर्याचं एक वेगळंच दर्शन घडत गेलं आणि या अनुभवांबद्दल असोशीनं बोलण्याची बायकांची मानसिक गरजही लक्षात आली. बाळंतपणाच्या संदर्भात सामान्य स्त्रीचा चेहरा मोहरा समाजापुढे आणणारे हे मराठीतले पहिलेच अनोखे पुस्तक आहे. |